छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायासाठी वेगळी पर्वणी मानली जाते. जवळपास 19 दिवस जग विसरून देवाचे नामस्मरण करीत पायी प्रवास करत पांडुरंगाच्या भेटीला भक्त जातात. मात्र अनेक भक्त असे असतात ज्यांची इच्छा असूनही ते एकादशीला दर्शनाला जाऊ शकत नाहीत; मात्र त्यांना भक्ती करण्याची इच्छा असते. असे म्हणतात की, पायी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये पांडुरंगाचा वास असतो. त्यामुळे अशा भक्तांसाठी लाडू तयार करून शहरातील भक्त आगळी-वेगळी भक्ती करतात. गेल्या पंधरा वर्षांपासून मनोज सुर्वे यांच्या सोबत हजारो नागरिक या उपक्रमात सहभागी होतात. सुरुवातीला अकरा हजार लाडू पासून सुरुवात झालेल्या उपक्रमात यावर्षी 72 हजार लाडू बांधण्यात आल्याची माहिती आयोजक समिती सदस्य मनोज सुर्वे यांनी दिली.
72 हजार लाडूंचे होणार वाटप:आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी आषाढी निमित्त पंढरपूरला पायी गेलेल्या वारकऱ्यांसाठी लाडू बांधले जातात. या उपक्रमाला 'माझा एक लाडू लाडक्या पांडुरंगाला' असे नाव दिले गेले. गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने उपक्रम राबवला जात आहे. प्रत्येक वर्षी सहभाग घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यंदा सिंधी कॉलनी येथे बालाजी मंगल कार्यालयात 72 हजार लाडू बांधण्यात आले. यासाठी एक हजार किलो शेंगदाणे, एक हजार किलो गूळ, शंभर किलो साजूक तूप वापरण्यात आले. या लाडूंचे एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे वारकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या निमित्ताने पांडुरंगाची आगळी वेगळी सेवा घडेल, अशी भावना उपक्रमात सहभागी नागरिकांनी व्यक्त केली.