छत्रपती संभाजीनगर : जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयातील 700 पेक्षा अधिक परिचारिकांनी संप पुकारला आहे. या संपामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील, अशी माहिती परिचारिकांनी दिली आहे.
घाटी रुग्णालयात रुग्ण सेवेवर परिणाम : जिल्ह्यातील घाटी रुग्णालय हे गोरगरिबांवर उपचार करणारे, या विभागातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांसह परिसरातील नगर, जळगाव, बुलढाणा या भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत असतात. हजारो गोर गरीब रुग्णांवर रोज मोफत उपचार केले जातात. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केल्यानंतर, परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आल्या असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. काही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतील, तर तातडीने गरजेच्या असलेल्या शस्त्रक्रिया केल्या जातील. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही रुग्णाला अत्यावश्यक सेवेपासून वंचित ठेवल्या जाणार नाही, याबाबत खबरदारी घेतल्याचं यावेळी संपकरी परिचारकांनी सांगितले.