औरंगाबाद- जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी दिवसभरात 550 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या आजपर्यंतची उच्चांकी संख्या असल्याने जिल्हा प्रशासनासमोरील चिंतेत भर पडली आहे. रोज नव्याने चारशेवर रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात आजपर्यंत 49,382 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 53,907 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1304 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
अंशतः टाळेबंदीने रुग्णसंख्या आटोक्यात येईल का?
जिह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात अंशतः टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये सकाळी सहा ते रात्री नऊ या काळातच बाजारपेठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शनिवार आणि रविवार दोन दिवस बाजारपेठा, हॉटेल, मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी दोन दिवस वगळता बाजारांमध्ये होणारी गर्दी आटोक्यात राहील का? आणि कोरोना नियंत्रणात राहील का? असे प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाहीत.
आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत मोरहिरा औरंगाबाद येथील 32 वर्षीय पुरुष, वैजापुरातील 75 वर्षीय पुरुष, चैतन्यनगर, सिडकोतील 49 वर्षीय स्त्री, रेल्वेस्थानक परिसरातील 51 वर्षीय स्त्री, उस्मानपुरा येथील 84 वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील माळीवाडा येथील 65 वर्षीय पुरुष, शहरातील नॅशनल वसाहतीतील 70 वर्षीय पुरूष आणि 69 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.