छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :कधी ड्रेनेज पाईप लाईन तर कधी पाण्याची पाईप लाईन टाकण्याच्या कारणाने चांगले रस्ते खोदले जातात. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. मात्र, यावर आता नियंत्रण येणार आहे. कारण रस्ते खोदण्याच्या आधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तर नवीन रस्ता तयार करायच्या आधी त्याखाली असणारे पाईप टाकण्याचे काम पूर्ण करून घ्यावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले. पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी ठेवण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्या वकील अॅड. रश्मी कुलकर्णी यांनी दिली.
Aurangabad Bench Directive: आता रस्ता खोदण्याच्या अगोदर घ्या न्यायालयाची परवानगी, खंडपीठाचे निर्देश
प्रशासनाला अथवा नागरिकांना कुठल्याही कामासाठी रस्ता खोदायचा असेल तर त्याआधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासंदर्भातील याचिका वकील अॅड. रश्मी कुलकर्णी यांनी असेफिया कॉलनी मधील नागरिकांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. यावर सुनावणी करताना खंडपीठाने स्पष्ट निर्देश दिले.
नागरिकांनी केली होती याचिका:शहरातील वॉर्ड क्रमांक २० असेफिया कॉलनी मधील नागरिकांनी न्यायालयात धाव घेत आपली व्यथा मांडली. त्यानुसार परिसरात नवीन रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र विकास काम करताना रस्त्याच्या खाली असलेली पाइपलाइन जुनी झाली असून त्याची दुरुस्ती देखील केलेली नाही. पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिश्रित होते. परिणामी नागरिकांना दूषित पाणी मिळते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. याबाबत स्थानिक पातळीवर तक्रार केली आहे. त्यावर विचार होत नसून नवीन रस्ता तयार केल्यावर पुन्हा पाइपलाइन दुरुस्ती संबंधात काही काम करावे लागले तर रस्ता फोडावा लागेल. तसे झाले तर रस्ता पुन्हा नवीन तयार होण्यास नव्याने खर्च आणि वेळ जाईल, असे याचिकेत म्हणले होते. त्यावर न्यायालयाने आधी परवानगी घ्या असे निर्देश दिले.
यापुढे घ्या परवानगी:शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. त्यात रस्त्यांची नव्याने कामे सुरू करण्यात आली; मात्र त्याच्या खाली असलेल्या पाईप लाईन जुन्या असल्याने काही दिवसात पुन्हा रस्ता खणला जातो. त्यामुळे छत्रपती संभाजी महानगर पालिका हद्दीत सिमेंट रस्ते खोदायचे असल्यास खंडपीठाची परवानगी घ्या असे निर्देश दिले. रस्ता का खोदावा लागेल, किती काम करावे लागेल याबाबत माहिती सादर करावी लागेल. त्याच बरोबर असेफिया कॉलनी येथे नागरिकांनी केलेल्या तक्रारीत आधी पाइपलाइनचे काम करावे आणि नंतर रस्ता करावा असे निर्देश दिल्याची माहिती याचिकाकर्ते वकील अॅड. रश्मी कुलकर्णी यांनी दिली.