औरंगाबाद- दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या गुन्हेगारांना पुंडलिकनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पहिल्या गुन्ह्यात सोनसाखळी चोरून पसार झालेल्या कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात महिलेचा विनयभंग करून फरार झालेल्या कुख्यात गुन्हेगारालाही पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी सोनसाखळी हिसकावलेल्या दोघांना पोलिसांनी २४ तासात पकडले आहे.
औरंगाबाद : तीन कुख्यात गुन्हेगार जेरबंद; जिवंत काडतूस व पिस्टल जप्त - Tipya Sheikh Maksood
दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या गुन्हेगारांना पुंडलिकनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. शेख जावेद उर्फ टिप्या शेख मकसुद आणि चाटे व खाडे असे गुन्हेगारांची नावे आहेत.
मुकुंदवाडी, पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे नऊ गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगार शेख जावेद उर्फ टिप्या शेख मकसुद याने २0१८-१९ साली दोन महिलांचा विनयभंग केला होता. या प्रकरणानंतर तो फरार झाला होता. त्याच्याबाबत रविवारी पुंडलिकनगर पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी टिप्याला सिडको, एन-३ भागातील अजयदीप काँप्लेक्सजवळ पकडले. यावेळी त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसे व पिस्टल जप्त करण्यात आली. यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई देखील करण्यात आली होती.
त्याचबरोबर पोलिसांनी चाटे आणि खाडे या दोन चोरट्यांना अटक केली आहे. प्रमोद दामोदर खाडे ( वय-२९, रा. चौधरी कॉलनी, पद्मावती, छत्रपती चौक, चिकलठाणा) हा १३ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास जात असताना त्याच्या गळ्यातील सतरा ग्रॅमच्या दोन सोनसाखळ्या चाटे आणि खाडेने हिसकावल्या होत्या. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना पकडून पोलिसांनी दोन्ही चेन जप्त केल्या आहेत.