महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इसिसच्या रासायनिक हल्ल्याच्या माहितीनंतरही जलकुंभाची सुरक्षा रामभरोसे - औरंगाबाद जलकुंभ

जानेवारी महिन्यात इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कातील चार संशयितांना शहरातील कैसर कॉलनी भागातून अटक करण्यात आली होती. त्यांच्या ताब्यातून घातक रसायने व इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करण्यात आली होती. त्यानंतर हे संशयित पाण्याच्या टाकीतून रासायनिक हल्ल्याच्या तयारीत असल्याचे समोर आले होते.

औरंगाबाद

By

Published : Mar 24, 2019, 12:43 PM IST

औरंगाबाद - जानेवारी महिन्यात इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कातील चार संशयितांना शहरातील कैसर कॉलनी भागातून अटक करण्यात आली होती. त्यांच्या ताब्यातून घातक रसायने व इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करण्यात आली होती. त्यानंतर हे संशयित पाण्याच्या टाकीतून रासायनिक हल्ल्याच्या तयारीत असल्याचे समोर आले होते. मात्र, या सर्वाची माहिती मिळूनही प्रशासनाकडून पाण्याच्या टाकीच्या सुरक्षे विषयी कोणतीच गंभीरता नसल्याने शहरातील सर्व जलकुंभाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे.

औरंगाबाद

जगात दहशत पसरवणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीला प्रेरित होऊन अतिरेकी हल्ल्याचा कट रचणारे चार संशयित मोहम्मद मोसीन सिराजुल्लाह खान, मोहम्मद मुशहेदुल इस्लाम, मोहम्मद तकीउल्लाह सिराज खान, काझी सर्फराज यांना दहशतवाद विरोधी पथकाने शहरातील कैसर कॉलनी भागातून अटक केली होती. हे चौघेही रासायनिक हल्ल्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यानंतर शहरातील जलकुंभाची सुरक्षा वाढविण्याची गरज निर्माण झाली होती. मात्र, शहरातील जलकुंभाचा आढावा घेतला असता, लाखो लोकांना पाणी पुरविणाऱ्या जलकुंभाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसते.

शहरातील ज्या भागातून संशयित दहशतवादी पकडण्यात आले होते. त्या परिसराच्या जवळच असलेल्या चिशतीया कॉलनी जलकुंभाचा आढावा घेतला असता, रात्री या जलकुंभावर 'कोणीही या कोणीही जा' अशी परिस्थिती होती. जलकुंभाच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकासाठी एक खोली आहे. त्या कक्षात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 'सीसीटीव्ही'चे कंट्रोलरुम आहे. मात्र, रात्रीच्या वेळेस या कक्षात कोणीही नसल्याचे दिसून आले, तर सीसीटीव्हीचे डिव्हीआरही उघेडेच होते.
लाखो लोकांच्या घरात पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलकुंभाची सुरक्षा 'राम भरोसे' आहे. मनपा आणि पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्याने भविष्यात मोठा धोका आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details