छत्रपती संभाजीनगर: देवळाणा बुद्रुक येथील एका व्यक्तीची अंत्ययात्रा चिखलातून नेताना नातेवाइकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. देवळाणा बुद्रुक येथे स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात मृतांवर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गावातील दगडू चाबुकस्वार यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी बाहेर गावावरून नातेवाईक आले. परंतु रस्ता चिखलमय, जागोजागी खड्ड्यात पाणी साचलेले असल्याने चिखल तुडवीत अंत्ययात्रा न्यावी लागली. यामुळे नातेवाईकांसह ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. याबाबतचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
अनेक वेळा मागणी : खुलताबाद तालुक्यातील देवळाणा बुद्रुक येथील आंबेडकर वस्तीच्या जवळ असलेला दीड किलोमीटरचा रस्ता, अनेक वर्षांपासून तयार झालेला नाही. गेल्या काही वर्षांपासून आसपासच्या शेतकऱ्यांनी रस्ता होऊ नये यासाठी वाद निर्माण केला, तो वाद चार वर्षांपूर्वी मिटला. त्यानंतर या ठिकाणी रस्ता करावा अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. मात्र, त्या मागणीकडे कोणत्याही राजकीय नेत्यांनी लक्ष दिले नाही. तिथल्या ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेत मागच्यावर्षी कच्चा रस्ता तयार केला होता. वर्षभरात रहदारी आणि नुकत्याच झालेल्या पावसामुळे तो पुन्हा खराब झाला. त्या रस्त्यावरून जाणे देखील अवघड झाले आहे. त्यात अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत जाणे म्हणजे सर्वात त्रासदायक ठरत आहे. त्याबाबत आपण चांगला रस्ता करण्याची मागणी केला असल्याचे माहिती, सरपंच नईम शहा यांनी दिली.