औरंगाबाद - पैठण तालुका प्रशासन आरोग्य विभाग हे बाहेरून आलेल्या नागरिकांना आत्तापर्यंत 100% विलगीकरण करण्यामध्ये यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. मागील ५५ दिवसांपासून पैठणमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. परराज्यातील तसेच अन्य जिल्ह्यांतून आलेल्या 8335 नागरिकांना विलगीकरण करण्यात आले होते. त्यातील 6065 नागरिकांना डिस्चार्ज दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.विजयकुमार वाघ यांनी दिली आहे. शनिवारी खांबजळगाव येथील महानुभव आश्रमात नाशकातून 28 नागरिक आले होते. त्यांना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थितीत त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. दिवसभरात 188 नागरिकांची विलगिकरणाची प्रक्रिया पार पडलीय.
औरंगाबाद जिल्हा 'रेड झोन'मध्ये असून दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. रविवार (17 मे) सकाळपर्यंत जिल्ह्यातील बाधितांची संख्या 958 वर पोहोचलीय. नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांचे विलगीकरण करण्यात यश मिळाल्याने कोरोनाचा विळखा सैल करण्यात प्रशासनाला मदत मिळाली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे गंगापूर आणि दौलताबाद या तालुक्यांमध्ये महामारीने एन्ट्री केली होती. मात्र आरोग्य प्रशासनाच्या तत्काळ खबरदारीमुळे यावर वेळी नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.