औरंगाबाद - जिल्ह्यातील भांबरवाडीच्या पुढे आणि चाळीसगाव घाटाजवळ कडाक्याच्या थंडीमध्ये स्त्री जातीचे नवजात बाळ आढळून आले आहे. अवघ्या एक ते दीड तासांचे हे बाळ असून ग्रामीण पोलिसांनी औरंगाबादेतील बालकल्याण समितीमार्फत सेवाभावी संस्थेकडे सुपूर्द केले आहे.
कडाक्याच्या थंडीत नवजात 'नकोशी'ला सोडून गेली आई - कन्नड औरंगाबाद
औरंगाबाद येथील कन्नडजवळ स्त्री जातीचे नवजात बाळ आढळले असून हे केवळ एक ते दीड दिवसांचे बाळ आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कन्नडवरून ७ किलोमीटर अंतराजवळच भाऊचा ढाबा आहे. येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कन्नडकडून एक क्रुझर गाडी आली. त्यामध्ये काही महिला होत्या. त्यांनी त्या नवजात बालिकेला तिथेच सोडल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. जवळपास १० मिनिटांनी आवाज आल्याने ढाबा मालकाने जाऊन बघितले. त्यावेळी त्याठिकाणी नवजात बालक आढळून आले. त्यानंतर त्याने ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.
कन्नड ग्रामीण पोलिसांनी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात प्रथमोपचार करून बाल कल्याण समितीकडे सोपविले. बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ज्योती पत्की यांनी या बालिकेला 'साकार' सेवाभावी संस्थेकडे सोपविले आहे. या बाळाची काळजी होमगार्ड माहिला कर्मचारी ए. आर. अग्रवाल व डी. एस. कांबळे यांनी घेतली. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध ३१७ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे, संजय आटोळे, ए. आर. शिप्पी करत आहेत.