महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 30, 2019, 2:48 PM IST

ETV Bharat / state

वर्षाच्या शेवटी वाढले विमान प्रवासी, नवीन वर्षात पर्यटनाला फायदा होण्याची शक्यता

विमान उड्डाण कमी झाल्याने औरंगाबाद पर्यटन आणि उद्योग व्यवसायावर फरक पडला होता. मात्र, वर्षाच्या शेवटी विमान कंपन्यांनी नवीन मार्गांवर सेवा सुरू केल्याने विमान प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आणि त्याचबरोबर अनेक उद्योजकांच्या भेटीही वाढल्या आहेत.

aurangabad
औरंगाबाद विमान प्रवास

औरंगाबाद - पर्यटनाची राजधानी आणि उद्योग हब असलेल्या औरंगाबादेत विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. वर्षाच्या शेवटी विमान कंपन्यांनी विमानसेवा सुरू केल्याने त्याचा फायदा झाला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी कमी झालेल्या विमानफेऱ्यांमुळे औरंगाबाद विमानतळाचे अस्तित्व अडचणीत आल्याचे बोलले जात होते. मात्र, औरंगाबादच्या पर्यटन व्यावसायिक आणि उद्योजकांनी केलेले प्रयत्न आणि विमान कंपन्यांनी नवीन उड्डाण सुरू केल्याने त्याचा फायदा झाल्याचे दिसून आले.

वर्षाच्या शेवटी वाढले विमान प्रवासी

विमान उड्डाण कमी झाल्याने औरंगाबाद पर्यटन आणि उद्योग व्यवसायावर फरक पडला होता. औरंगाबाद मार्गे शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची रेलचेल असल्याने पर्यटकांची हजेरी औरंगाबादेत नेहमीच असायची. मात्र, शिर्डीला विमानसेवा सुरू झाल्याने विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घट झाल्याचे सांगत विमान कंपन्यांनी आपल्या फेऱ्या कमी केल्या होत्या. तर, काही कंपन्यांनी आपली सेवा बंद केली होती. त्यामुळे औरंगाबादच्या पर्यटनात घट झाल्याचे दिसून आले. मात्र, वर्षाच्या शेवटी विमान कंपन्यांनी नवीन मार्गांवर सेवा सुरू केल्याने विमान प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आणि त्याचबरोबर अनेक उद्योजकांच्या भेटीही वाढल्या आहेत.

हेही वाचा -औरंगाबादला दोन मंत्रिपदे; अब्दुल सत्तार अन् संदीपान भुमरेंची वर्णी

एअर अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अहवालानुसार नोव्हेंबर २०१८ मध्ये ३१ हजार २९२ प्रवाशांनी विमान वाहतूक केली होती. मात्र, २०१९ यावर्षात काही महिने विमानसेवा कमी झाली असूनही नोव्हेंबर महिन्यांपर्यंत ३८ हजार १३९ प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. तर, ६१३ विमान उड्डाण औरंगाबाद विमानतळावरून झाली आहेत. नवीन वर्षात अनेक विमान कंपन्या विमानसेवा सुरू करणार असल्याचे संकेत मिळाले असल्याने २०२० यावर्षी विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढलेल्या विमान प्रवाशांमुळे पर्यटन आणि उद्योगांना चालना मिळेल अशी आशा औरंगाबादच्या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - जालन्याच्या सुदर्शन खरातला राष्ट्रीय विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक

ABOUT THE AUTHOR

...view details