औरंगाबाद- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र, नागरिक त्याला प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. मात्र, आता कन्नड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा स्वाती कोल्हे व मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. कन्नड शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे त्यांनी भाजी मंडईमध्ये दोन मीटरच्या अंतरावर कलरने चौकोन आखले आहेत. भाजीपाला घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना नगरपरिषद कर्मचारी गेट द्वारे सोडत आहे. त्यामुळे भाजी बाजारात येणाऱ्या नागरिकांची आता गर्दी होताना दिसत नाही.
क्रीडा संकुलनात उभारली भाजी मंडई... हेही वाचा-जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्यांवर करणार कठोर कारवाई - गुलाबराव पाटील
भाजी मंडईमध्ये नेहमीच गर्दी असते. मात्र, आता कोरोनामुळे सतर्क राहण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पाहिजे त्या प्रमाणात याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन एका ठिकाणी भाजी मंडई आणि फळ विक्रेता अशी दुकाने वेगवेगळी ठेवण्याचे ठरवले आहे. दुकानांसमोर दोन मीटर अंतर ठेवत रंगाने बॉक्स केले आहेत. जेणेकरुन नागरिकांमध्ये अंतर राहील आणि कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून बचाव होईल. कन्नड नगरपरिषद व कन्नड पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी सहकार्य करण्याचे नागरिकांना आव्हान केले आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे.