पैठण (औरंगाबाद)- झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना महामारीने पैठण तालुक्यात शंभरी पार केली आहे. मागील दोन दिवसात तालुक्यात 21 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण भागाचा समावेश असून, चितेगाव येथील एका फार्म कंपनीमध्ये तब्बल 18 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासन सतर्क झाल्याचे चित्र दिसत आहे.
पैठण शहरात नेते, अधिकारी, व्यापारी आणि पत्रकारांसह नागरिकांचे एकमत करत 14 जुलैपासून 20 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायती स्तरावर लॉकडाऊनचा ज्या त्या ग्रामपंचायतींवर निर्णय सोडण्यात आले होते. काही ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत आपल्या ग्रामपंचायत हद्दीत लॉकडाऊनचा निर्णय घेतला, मात्र औद्योगिक क्षेत्र असलेले चितेगाव ग्रामपंचायतीने हा निर्णय धुडकावत औद्योगिक क्षेत्र सुरूच ठेवले.