कन्नड (औरंगाबाद) - अमेरिकेतून आलेल्या दोन कोरोना संशयितांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीस कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे लक्षण नसल्याचे कन्नड ग्रामीण रुग्णालयाने शनिवारी (21 मार्च) स्पष्ट केले आहे. अमेरिकेतून दोघे जण आले असून, ते कोरोना संशयित असल्याची माहिती नगर परिषदने कन्नड पोलीस ठाणे व ग्रामीण रुग्णालयाला दिली होती. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची भेट घेतली होती.
हेही वाचा -कोरोना अपडेट : आरोग्यमंत्री थेट रेल्वेस्थानकवर; अधिकाऱ्यांची भेट घेत केली तपासणी
दोघे जण अमेरिकेतून 17 मार्चला कन्नड येथे आले होते. ते आपल्या घरी दाखल झाल्यानंतर 19 मार्चला कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी दोघांबद्दल लेखी पत्र देऊन पुढील कारवाईसाठी कळविले होते. त्यानुसार त्या दोघांचे स्वयंमूल्यमापन अर्ज भरून घेण्यात आले. त्यानुसार त्या दोघांत कोरोना संबंधित कोणतेही लक्षण आढळून आले नसल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच अजून एका व्यक्तील कोरोना नसल्याचे कळवण्यात आले आहे.
दरम्यान, शनिवारी (21 मार्च) सायंकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी संबंधितांच्या घरी जाऊन त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे.