प्रदीप सोळुंके प्रतिक्रिया व्यक्त करताना औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या विरोधात केलेली बंडखोरी राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांना पक्षातून काढण्यात आले आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सूचना देऊनही सोळुंके यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी या संदर्भातील पत्र काढले असून सोळुंके यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले.
उमेदवारी चर्चेत : विद्यमान आमदार विक्रम काळे यांना उमेदवारी देण्याचा पक्षात निश्चित असतानाच प्रदीप सोळुंके यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पत्र पाठवत उमेदवारीवर दावा केला होता. एकालाच किती दिवस मोठे करायचे, आता भाकरी फिरवली पाहिजे. काळे यांच्याविरोधात शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, त्यामुळे यावेळी मला उमेदवारी द्या, अशी मागणी प्रदीप सोळुंके यांनी केली होती. मला द्यायची नसेल तर इतर कुणाला उमेदवारी द्या, पण काळेंना नको, अशी भूमिका सोळुंके यांनी घेतली होती.
उमेदवारी अर्ज कायम : अजित पवार यांच्या उपस्थितीत विक्रम काळे यांचा अर्ज दाखल केल्यानंतरदेखील सोळुंके यांनी आपला अर्ज भरला होता. अजित पवारांनी सोळुंके यांना माघार घेण्याचे आवाहन केले होते. ते वरिष्ठांचे ऐकतील, असा विश्वास व्यक्त केला होता. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोळुंके यांनी आणखी आक्रमक भूमिका घेत काळे यांना, पक्षाची इज्जत वाचवायची असेल तर माघार घ्या आणि मला पाठिंबा जाहीर करा, असे आवाहन सोशल मिडीयावरून करीत ते नॉटरिचेबल झाले. तर सोळुंके यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला.
विजयाचा दावा : आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानंतर प्रदीप सोळुंके यांनी दावा केला की, मी बंडखोरी केली नाही तर सच्च्या कार्यकर्त्यांचे प्रतिनिधीत्व करत आहे. माझ्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्यावर पक्ष कारवाई करूच शकत नाही. आतापर्यंत विक्रम काळे हे माझ्याकडे कधीच आले नाहीत. त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकही काम केले नाही. आता मी त्यांच्याविरोधात अर्ज भरला असताना ते माझ्याकडे अर्ज मागे घेण्याची विनंती करत आले. परंतु, मी अर्ज मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला असून निवडणूक निकालानंतर माझाच विजय झाल्याचे दिसेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रदीप सोळुंके यांनी असे सांगितल्याने राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडखोरीने विद्यमान आमदार यांचे मताधिक्य कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :Symbol : धनुष्यबाण कुणाचा! ठाकरे गटाचा युक्तीवाद पुन्हा सुरू; आजच फैसला?