औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते पक्ष सोडून जात असल्याने पक्षाची पडझड मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, औरंगाबादच्या राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बॉण्ड पेपरवर शपथपत्र देऊन, जिवंत असेपर्यंत पक्ष सोडणार नाही, असा विश्वास दिला आहे.
दादाराव जगन्नाथ कांबळे यांची प्रतिक्रिया दादाराव जगन्नाथ कांबळे, असे शपथपत्र लिहून देणाऱ्या युवकाचे नाव आहे. काहीही झाले तरी आपण पक्ष सोडणार नाही, असे शपथपत्र त्याने शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लिहून दिले आहे. पक्षातील बड्या नेत्यांनी पक्ष सोडल्याने व्यथित झालो आहे. साहेबांचा आदर करतो, त्यामुळे त्यांना सोडून जाणार नाही, असे शपथपत्र दिल्याचे दादाराव यांनी सांगितले.
हेही वाचा - शिवसेना संपवू म्हणणाऱ्या नारायण राणेंना आमचा विरोध कायम - गुलाबराव पाटील
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दादाराव कांबळे इतिहास विषयात पी. एचडी करत आहेत. विद्यार्थीदशेत आल्यापासून शरद पवार यांच्याविषयी आलेल्या अनुभवांमुळे शरद पवार यांचा आदर दादाराव यांना आहे. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे काम हाती घेतले. सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी पक्षात सुरू असलेली पडझड पाहून व्यथित झाल्याचे दादाराव कांबळे यांनी सांगितले.
हेही वाचा - शरद पवारांना या वयातही फिरावे लागते हे क्लेशदायक - विनायक मेटे
शरद पवार ज्या पद्धतीने या वयात काम करत आहेत हे पाहून उत्साह आला आहे. साहेबांच्या पाठीशी कायम उभे राहणार असल्याचा विश्वास पवार साहेबांना देण्यासाठी आपण शपथपत्र तयार केले आहे. या शपथपत्रात आपण जिवंत असेपर्यंत साहेब आणि पक्ष सोडणार नाही, असा विश्वास दिल्याचे दादाराव कांबळे यांनी सांगितले.