औरंगाबाद - केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या नव्या कामगार कायद्यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये गुरुवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून 5 किलोमीटरची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. औरंगाबादच्या बाबा पेट्रोल पंप चौकापासून ते चिकलठाणा परिसरातील धूत रुग्णालयापर्यंत विविध कामगार संघटनेच्या कामगारांनी हातात मागण्यांचे फलक घेत मानवी साखळी तयार केली. कोरोनामुळे सोशल डिस्टन्स पाळा असे शासन सांगते, त्यामुळे मानवी साखळी करत असताना दोन आंदोलकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून आंदोलकांनी ही मानवी साखळी तयार केली होती.
आंदोलनासाठी संविधान दिनाची निवड
26/11 हा दिवस ऐतिहासिक आहे. आजच्या दिवशी संविधान लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे संविधान दिनाच्या दिवशी देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर 26/11ला मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांचा आज स्मृती दिवस आहे. त्यामुळे आज आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कामगार नेते अभय टाकसाळ यांनी दिली.
या आहेत मागण्या...
केंद्र सरकारने लागू केलेल्या कामगार कायद्याच्या विरोधात कामगार संघटनांनी आज बंदची हाक दिली. या आंदोलनात विविध स्तरातील कामगार संघटना आणि कामगार यांनी सहभाग घेतला होता. शहरातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपात आंदोलन करण्यात आलं.