छत्रपती संभाजीनगर Nanded Hospital Death Case : खासदार हेमंत पाटील यांनी वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतल्याने राग व्यक्त केला जातोय. याप्रकरणी ठाकरे गट युवासेनेच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं. रेल्वे स्टेशन परिसरातील सार्वजनिक स्वच्छता गृहाच्या भिंतीवर हेमंत पाटील (MP Hemant Patil Photo) यांचा फोटो लावून त्याखाली त्यांचा मोबाईल क्रमांक नमूद केला. 'तुमचे स्वच्छता गृह स्वच्छ करण्यासाठी संपर्क साधा' असं त्यावर लिहिण्यात आलं आहे. तर या खासदारांना सत्तेचा माज आला असून त्यांना अटक करा अशी मागणी शहरप्रमुख आदित्य दहिवाल (Aditya Dahiwal) यांनी केली.
युवासेनेच्या वतीने अनोखे आंदोलन : खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूबाबत रोष व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिष्ठाता एस आर वाकोडीकर (Dean Vakodikar) यांच्याकडून स्वच्छता गृहाची स्वच्छता करून घेतली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अशी वागणूक देणे योग्य नसल्यानं सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय. त्यात गुरुवारी युवा सेनेच्या वतीनं खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. रेल्वे स्टेशन परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहात हेमंत पाटील यांचा फोटो लावून त्याखाली त्यांचा मोबाईल क्रमांक नमूद केला. 'आपल्याकडील स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी खासदाराला फोन करा' असं तिथं लिहिण्यात आलं. एका वैद्यकीय अधिकाऱ्याला अशा पद्धतीने वागणूक दिली जात आहे, त्यांनाही तशीच वागणूक मिळाली पाहिजे. त्यामुळे आंदोलन केल्याचं ठाकरे गट युवा सेना शहरप्रमुख आदित्य दहिवाल यांनी सांगितलं.