छत्रपती संभाजीनगर :आज शहरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. रामनवमी दरम्यान झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. विविध भागात आणि सभा ठिकाणी असे दोन हजार पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अनेक ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. सभेला पोलिसांनी परवानगी दिली असली तरी 16 अटी त्यामध्ये लावण्यात आल्या आहेत. यामध्ये कोणाच्याही भावना दुखावणार नाही असे वक्तव्य करू नये, प्रक्षोभक भाषण करू नये, परिस्थिती खराब होईल, अशा पद्धतीने वक्तव्य करू नये, अशा काही अटी लावण्यात आलेले आहेत.
शहरात नेत्यांचे आगमन : सभेच्या तयारीचा पुर्ण आढावा घेण्यासाठी महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेले उद्धव ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई, अनिल परब सकाळपासून शहरात दाखल झाले. तर सकाळी मनीषा कायंदे, अमित देशमुख यांच्यासह इतर नेत्यांनी शहरात प्रवेश केला. कुठल्याही परिस्थितीत वज्रमूठ सभा होणारच, असा विश्वास प्रत्येक नेते व्यक्त करताना दिसून आले. शहरात झालेल्या दंगलीनंतर सभा घेऊ नका, अशा पद्धतीचे मागणी करण्यात येत होती. मात्र, महाविकास आघाडीची सभा होऊ नये, यासाठी अनेकजण देव पाण्यात बुडून बसले आहेत. मात्र सभेला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली.
सभेबाबत तयारी : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या सभेबाबत तयारी सुरू आहे. अनेक नेते या सभेला संबोधित करणार आहेत. सरकारविषयी असलेली नाराजी या सभेतून व्यक्त होईल. मात्र संभाजीनगर नामकरण झाल्यानंतर जी परिस्थिती ओढवली. त्यामुळे ह्या सभेवर परिणाम होईल, असे अनेकांना वाटत होते, मात्र तसे होणार नाही असे देखील मनीषा कायदे यांनी सांगितले. तर जे आमदार शिंदे गटात गेले आहेत, त्यांची सध्या काय परिस्थिती आहे? हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. दोन-तीन वेळेस निवडून आले म्हणून काही लोक त्यांच्यासोबत असतील, मात्र त्यांनी जनतेचा विश्वास त्यांनी गमावला आहे अशी टीका मनीषा कायदे यांनी संभाजीनगर विमानतळावर केली.