औरंगाबाद - महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेतर्फे (मुप्टा) प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि. २१) पैठणगेट येथे ‘चाय बेचो’ आंदोलन करण्यात आले. शासनाच्या अन्यायपूर्ण धोरणांचा निषेध म्हणून व सर्व अंशत: २० टक्के अनुदानित, अघोषीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान प्राप्त व्हावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनातून ५७७ रूपये जमविण्यात आले असून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यामार्फत ते सरकारला देण्यात येणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
औरंगाबादमध्ये विनाअनुदानित शिक्षकांचे 'चाय बेचो’ आंदोलन; मिळालेले ५७७ रूपये देणार सरकारला - MUPTA
सरकारच्या अन्यायपूर्ण धोरणांचा निषेध म्हणून व सर्व अंशत: २० टक्के अनुदानित, अघोषीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान प्राप्त व्हावे, यासाठी महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेतर्फे (मुप्टा) पैठणगेट येथे ‘चाय बेचो’ आंदोलन करण्यात आले.
अंशत: अनुदानित १६२८ शाळा, २४५२ वर्ग तुकड्या व १/२ जुलै २०१६ च्या शासन निर्णयान्वये २० टक्के अनुदानित शाळा व तुकड्या यांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान मिळावे, १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रुजू झालेल्या प्राथमिक शिक्षकांना टीईटीतून वगळण्यात यावे, १४६ घोषीत, १ हजार ६५६ मंत्रालयीन स्तरावरील व ५७८ पुणे स्तरावरील मूल्यांकन पात्र अघोषित उच्च माध्यमिक, माध्यमिक शाळांना त्वरित घोषीत करून प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, अशा प्रमुख मागण्या संघटनेमार्फत करण्यात आल्या आहेत.
यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने समितीच्यावतीने या मागण्यासाठी आंदोलने करण्यात आली. परंतु शासनाने दखल न घेतल्याने ‘चाय बेचो’ आंदोलन करण्यात आले. यात प्रा. सुनील मगरे, डॉ. संभाजी वाघमारे, शिवराम म्हस्के, राजेंद्र जाधव, मिलिंद खरात, कृष्णा मुळीक, संतोष जाधव, मलखांब राठोड, शेख मुनीर, लक्ष्मण हिवाळे, मंगेश पावर, पद्माकर कांबळे, त्रिंबक पवार, दीपक कुलकर्णी, गणेश आकात, अस्लम कादरी, व्ही. एम. राठोड यांनी सहभाग नोंदविला.