औरंगाबाद- जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये यंदा पहिल्यांदाचसरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात सलग २० दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ऐन काढणीला पाऊस आल्याने मूग पिकाचे आतोनात नुकसान झाले. याशिवाय कांदा पिकाचेही नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
सद्यपरिस्थितीत मूग काढणीला आला आहे. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे तो काढणे शक्य नाही. जास्तीच्या पावसामुळे शेंगा ओल्या झाल्या आणि शेंगामधील मुगाला कोंब फुटू लागले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेंगा झाडावरच खराब झाल्या. खराब झालेले हे पीक शेतकरी काढून टाकत आहेत. अशा शेंगा जनावरांना देखील खाण्यास योग्य नाहीत, अशी माहिती पळशी गावचे शेतकरी अनिल पळसकर आणि सोमनाथ पळसकर यांनी दिली.