औरंगाबाद - शेतकऱ्यांना अडचणीच्या दिवसात पीक विम्याची रक्कम मिळायला हवी, पिक विमा कंपनी विम्याची रक्कम देण्यासाठी वेळकाढूपणा करीत असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई न देणाऱ्या कंपन्यावर भविष्यात कठोर नियमावली तयार करू व शेतकऱ्यांना आधार देऊ, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करून पाठविल्यास सरकार यासाठी सर्वोतपरी मदत करेल. कन्नड तालुक्यातील महिला कार्यकत्यांनी केलेल्या आदरातिथ्यामुळे मी भारावून गेल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांचा पीक विमा, कन्नड तालुक्यात पर्यटन वृद्धीसाठी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या.
शहरी व ग्रामीण भागात विद्यार्थी संख्या वाढत आहे मात्र, अंगणवाडी संख्या कमी आहे. शहरी भागाचा विचार केला असता नगरपालिका क्षेत्रात 50 हजाराहून जास्त लोकसंख्या असून त्या अनुषंगाने अंगणवाड्याही कमी आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना पालन-पोषण आहार कमी पडू देणार नाही. हे सरकार गरीब-दुबळ्यांचे सरकार आहे, बुलेट ट्रेन उशिरा येईल, परंतु माझ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पालन पोषण आहार पूर्ण मिळेल, अशी ग्वाही या सरकारचा वतीने देते, असे सुळे म्हणाल्या.