औरंगाबाद -राज्यातील सर्व दुकानांवर यापुढे मराठी भाषेतील पाट्या लावा असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र या निर्णयानंतर आता राज्यातील राजकारण तापत चालल आहे. नुसत्या पाट्या लावून रोजगार निर्माण होणार आहे का? असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. तर जलील यांनी आत्तापर्यंत किती रोजगार निर्माण केले याचे उत्तर द्यावे, असा प्रश्न मनसेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.
मराठी पाट्यांबाबत खासदार जलील यांनी केली टीका
निवडणुका आल्या की मराठीचा मुद्दा काढला जातो, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे. सध्या कोरोना काळामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत. घरी दोन वेळचे अन्न त्यांना मिळत नाही. अशा मराठी माणसाने या लोकांना सत्तेत पाठवला आहे. मराठी पाट्या लावून रोजगार निर्माण होणार आहेत का? असा प्रश्न खासदार जलील यांनी उपस्थित केला. आता आगामी निवडणुकीत मराठीचा मुद्दा इतर पक्षांनी घेऊ नये किंवा त्या मुद्द्यावर पुन्हा कोणी आक्रमक होऊ नये, यामुळे शिवसेनेने त्या मुद्द्याला हात घालून मराठी पाट्या लावण्याचा आदेश दिले आहेत. मराठी भाषेबद्दल आम्हाला अभिमान आहे. मात्र त्या आडून हे राजकारण करण्याचे काम केले जात आहे, असा आरोप देखील खासदार जलील यांनी केला आहे.