औरंगाबाद- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनावरून आता औरंगाबादेत राजकारण रंगताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला ऑनलाइन हजेरी लावली. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली. मी गैरहजर असल्यावर मला देशद्रोही म्हणून घोषित करता, मग मुख्यमंत्री आले नाही तर ते देशभक्त कसे, असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन उपस्थित केला आहे.
एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या जलील मागील आठ वर्षांपासून मराठवाडा मुक्ती संग्रामात या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. पाच वर्षे आमदार आणि दोन वर्षे खासदार असताना त्यांची गैरहजेरी राजकारणाचा विषय ठरत आहे. शिवसेनेने 2019च्या मुक्तिसंग्राम कार्यक्रमात खासदार उपस्थित नसल्याने जहरी टीका केली होती. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार जलील यांना रझाकार म्हणून देखील संबोधले होते. त्यामुळे चांगलाच राजकारण तापत असताना यावर्षी शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी न लावल्याने खासदार जलील यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमावेळी मी उपस्थित राहिलो नाही त्यावेळी मला देशद्रोही म्हणून संबोधले गेले. यावर्षी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ध्वजारोहणाला यायला हवे होते. मात्र, ते प्रत्यक्षात आले नाही मी गैरहजर राहिलो तर मला देशद्रोही म्हणून तुम्ही आरोप केलात आता मुख्यमंत्री स्वतः या कार्यक्रमाला गैरहजर राहिले तर ते देशभक्त कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझ्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह का उपस्थित केले नाही, असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन उपस्थित केला. त्यामुळे आगामी काळात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन राजकीय पक्षांसाठी परस्पर विरोधी विधान करणारा ठरेल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.