महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'...तर त्यावेळी काँग्रेसने मोठी संधी गमावली असेच म्हणावे लागेल' - aurangabad

2014 साली सुद्धा शिवसेनेने काँग्रेसला सत्तेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते, तर त्यावेळी काँग्रेसने मोठी संधी गमावली, असेच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया खासदार हुसेन दलवाई यांनी दिली.

खासदार हुसेन दलवाई
खासदार हुसेन दलवाई

By

Published : Jan 22, 2020, 9:41 PM IST

औरंगाबाद- पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार 2014 साली सुद्धा शिवसेनेने काँग्रेसला सत्तेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी काँग्रेसने मोठी संधी गमावली, असेच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया खासदार हुसेन दलवाई यांनी दिली. मला याबाबत काही माहिती नाही, असे म्हणत दलवाई यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बोलताना खासदार हुसेन दलवाई

मुस्लीम समाजाच्या दबावामुळे काँग्रेसने शिवसेनेबरोबर महाविकास आघाडी करत सरकार स्थापन केले. या सामाजिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, असे खासदार दलवाई म्हणाले. मुस्लीम समाजातून मला सुद्धा अनेक फोन आले व ही आघाडी करावी, असा आग्रह करण्यात आला. मात्र, एकट्या मुस्लीम समाजाच्या दबावामुळे ही महाविकास आघाडी झाली हे म्हणणे योग्य नव्हे, असेही ते म्हणाले. शिवसेनेच हिंदुत्व हे मराठी माणसाच्या हक्कासाठी असून ते भाजपच्या कडव्या हिंदुत्वासारखे नाही, असे मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आणि केरळ काँग्रेसच्या नेत्यांना अनेक उदाहरणे देत पटवून दिले. त्यानंतरच सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला व सर्वात अगोदर मीच भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी ही आघाडी काळाची गरज असल्याचे सांगितले, असा दावा काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत केला.

हेही वाचा - औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर अपघात, एकाचा मृत्यू

मौलाना आझाद विचार मंचाच्या तीन दिवसीय मेळाव्यासाठी खासदार हुसेन दलवाई शहरात आले आहे. मौलाना आझाद विचार मंच आयोजित तीन दिवसीय कार्यकर्ता मेळावा औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला असून 23, 24 व 25 जानेवारी 2020 हा मेळावा होणार आहे. मेळाव्याच्या उद्घाटनाला सामाजिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व गीतकार जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याचा समारोप विधान सभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती हुसेन दलवाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा - मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची आमदार प्रशांत बंब यांनी बोलावली बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details