गंगापूर (औरंगाबाद) :गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला एक अनोखा प्रसंग घडला आहे. सासूने सुनेला मकर संक्रांतिनिमित्त स्वतःची किडनी देऊन अनोखे वाण देऊन आपली सूनबाई योगिता संजय जयस्वाल यांचे प्राण वाचवले आहे. त्यामुळे तालुक्यात सगळीकडेच सासू रत्नाबाई रमेश जयस्वाल यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सुनबाईला दिलेल्या वाणाची सर्वत्र चर्चा : नवीन वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांत ओळखली जाते. मकर संक्रांति निमित्त महिला एकमेकींना हळदी कुंकाच्या वस्तूसह अनेक वस्तू वाण म्हणून देत असतात. गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील जयस्वाल कुटुंबातील सासू रत्नाबाई रमेश जयस्वाल यांनी आपल्या सून योगिता संजय जयस्वाल यांना मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला किडनी दान करत अनोखे वाण देऊन आपल्या सुनेचे प्राण वाचवले आहे. या अनोख्या वाणाची सर्वत्र चर्चा आहे. स्वतःची किडनी देऊन सुनबाईचे प्राण वाचवणाऱ्या सासूबाई रत्नाबाई जयस्वाल यांनी जगासमोर एक आदर्श ठेवला आहे.
मागील काही दिवसापासून किडनी आजाराने त्रस्त :लासुर स्टेशन येथील जयस्वाल कुटुंबातील योगिता संजय जयस्वाल या मागील काही दिवसापासून किडनी आजाराने त्रस्त होत्या. अनेक दिवसापासून त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र काही दिवसापासून त्यांना किडनी आजाराच्या वेदना असाहाय्य झाल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. मात्र किडनी दान करणारा दाता सापपडण्याचे आव्हान जयस्वाल कुटुंबीयापुढे उभे होते.