औरंगाबाद - काही वेळा चांगल्या गोष्टींसाठी बदल आवश्यक असतात. मात्र, काही लोक आज भूमिका बदलून सत्तेत आहे, असा अप्रत्यक्ष टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला लगावला. ते येथे बोलत होते. मनसेने बदललेल्या आपल्या नवीन झेंड्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत त्यांनी शिवसेनेवर ही टीका केली आहे.
राज्यात सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार किती काळ सत्तेत असेल? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, हे सरकार दोन वर्ष चालेल, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार यांना एका कार्यक्रमात राज्य सरकारबद्दल विचारले असता, त्यांनी 2 वर्षे या सरकारला काम करू द्या असे सांगितले आहे. राज पुढे म्हणाले, मनसेने कोणतीही भूमिका बदलली नाही. रझा अकादमीच्या विरोधात मीच मोर्चा काढला होता. हिंदू हिंदू म्हणणाऱ्यांनी नाही. एवढेच नव्हे तर भोंगे काढण्याचा विषयही मीच मांडला होता, पाकिस्तानी कलावंताना हाकलून लावा, हीसुद्धा माझीच भूमिका होती. हिंदुत्वाचा मुद्दा जनसंघाचा आहे. मात्र, तो कोण कसा मांडतो आणि पुढे नेतो हे जास्त महत्त्वाचे आहे, असेही राज यांनी स्पष्ट केले. मनसेने आपली भूमिका बदलल्याची भावना जनेतेला वाटत नाही. काही चांगल्या गोष्टींसाठी बदल आवश्यकच असतात. मात्र, अनेक लोक भूमिका बदलून सत्तेत आले आहेत, अशी अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी यावेळी शिवसेनेवर केली.