औरंगाबाद- राज्यातला शेतकरी ओल्या दुष्काळात सापडला आहे. खरिप हंगामातील मक्का, कपाशी, सोयाबीन, बाजरी या सर्व पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई झालेल्यांना भरपाई देण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेने गंगापूर तहसील कार्यालयासमोर 'शेतकरी वाचवा, कुंकू वाचवा' आंदोलन केले.
शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी मनसेचे गंगापूर येथे आंदोलन हेही वाचा -राज्यातील 'युती' बिघडल्याने याचे औरंगाबादच्या राजकारणावर पडणार पडसाद?
सरकार स्थापन करण्यासाठी अजूनही विलंब होत आहे. एकीकडे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला असून त्यांच्याकडे बघायला कोणाचेही लक्ष नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.
यावेळी शेतकरी, महिला बांधव यांच्याकडून तहसील कार्यालयासमोर कपाशीच्या कैऱयांची गळ्यात माळ घालून कुंकू वाचवा आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी सरसकट नुकसान भरपाई, तात्काळ पिकांचा विमा मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा -उमेदवारी अर्ज भरताना हयात असणाऱ्या अपत्यांनाच गृहीत धरा; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
तहसील कार्यालयासमोर सुमारे दोन तास आंदोलनकर्ते बसून होते. यावेळी तहसीलदार अविनाश शिंगोटे यांना निवेदन देऊन सर्व मागण्यांचे हमीपञ आंदोलनकर्त्यांनी लिहून घेतले. यावेळी मनसेचे माजी बांधकाम सभापती संतोष जाधव, अण्णा जाधव, शंकर औताडे, राम वाकळे, नवाज शेख आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलेला होता.