औरंगाबाद- दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्क माफी न दिल्याने मनसे विद्यार्थी सेनेने परीक्षा मंडळ कार्यालयात झोपा काढा आंदोलन केले. परीक्षा मंडळ परिस्थिती माहित असूनही झोपेचे सांग घेत असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयात झोपा काढून आंदोलन केले.
दुष्काळग्रस्त भागातील मुलांना परीक्षा शुल्क परत द्या; मनसे विद्यार्थी सेनेची मागणी - Jalna
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्क माफी न दिल्याने मनसे विद्यार्थी सेनेने आज औरंगाबादमधील परीक्षा मंडळ कार्यालयात झोपा काढा आंदोलन केले.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेण्यात आला होता. दुष्काळच्या झळा सोसणाऱ्या औरंगाबाद विभागाअंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार होता. सदर शुल्क माफीसाठी आवश्यक निधी राज्य सरकारने शिक्षण मंडळास उपलब्ध करुन दिला. असे असतानादेखील केवळ शिक्षण मंडळाच्या अनास्थेमुळे विद्यार्थ्यांना आजवर शुल्क माफीची रक्कम मिळाली नाही. मनसे कार्यकर्त्यांनी याचा जाब विचारला. मात्र, योग्य उत्तर मिळत नसल्याने आज त्यांनी परीक्षा मंडळ कार्यालयात आंदोलन केले.
राज्य सरकारने शुल्क माफीचा निर्णय जरी घेतला तरी त्या निर्णयाची प्रत्यक्ष अमंलबजावणी करण्यात शिक्षण मंडळ सपशेल अपयशी ठरले आहे. दहावी-बारावीचा निकाल लागल्यानंतर जेव्हा विद्यार्थी शाळा, महाविद्यालयामध्ये आपला निकाल घेण्यासाठी जातात तेव्हाच परिक्षा शुल्क माफीची रक्कम त्यांच्या हातात पडणे अपेक्षीत होते. पण त्या दृष्टीने विभागामार्फत कुठलेच प्रयत्न झाले नाही. त्यामुळे जवळपास ३ लाख ४५ हजार ५६९ विद्यार्थ्यांना शुल्क माफीपासून वंचित राहावे लागले, असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला. तसेच यावेळी परीक्षा शुल्क माफ करून पैसे देण्याची मागणीही मनसेतर्फे करण्यात आली.