कन्नड (औरंगाबाद) - शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योगाकडे वळावे, असे आवाहन आमदार उदयसिंग राजपूत यांनी केले. ते कन्नड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते. बदलत्या काळात शेतकऱ्यांनी बदलण्याची गरज असल्याचेही मत आमदार राजपूत यांनी व्यक्त केले.
कन्नड शहरातील गजानन हेरिटेज येथे कन्नड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे 'विकेल ते पिकेल' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत कृषी प्रक्रिया उद्योगाच्या संधीबाबत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, रिसोर्स फार्मर यांच्या तालुकास्तरीय एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना आमदार उदयसिंग राजपूत म्हणाले, की पूर्वी उत्पादन वाढ, खते, कीटकनाशके यांचा वापर कसा करायचा हे शिकणे शेतकऱ्यांसाठी काळाची गरज होती. परंतु आता काळ बदलल्याने कृषी माल प्रक्रिया, ब्रँडिंग व मार्केटिंगचा काळ आहे. यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत.
कार्यशाळेत कृषी विभागाच्या पोकरा, स्मार्टसह इतर शेतकरी गट अनुदानाच्या योजनांची माहिती उपस्थित शेतकरी व बचतगटांना देण्यात आली. डॉ. जाधव म्हणाले की, निसर्ग व हवामान मानवाच्या हातात नाही. स्वतःची प्रगती साधण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र आल्यास सरकारच्या अनेक योजनांचा त्यांना लाभ मिळू शकतो.
डॉ. मोटे यांनी पोकरा व स्मार्ट योजनेबाबत एलसीडी स्क्रीनच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. देवळणकर यांनी प्रक्रिया उद्योगसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र येण्याची आवाहन केले. यावेळी कृषिभूषण संतोष जाधव, गुजरात कृषिभूषण अजय जाधव, किरण पवार, कारभारी मनगटे आदी शेतकऱ्यांनी स्वतःचा अनुभव सांगत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी केले. तर सूत्रसंचालन संजीव साठे यांनी तर आभार प्रभोद चव्हाण यांनी मानले.
कार्यशाळेला विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव, कृषी सहसंचालक उदय देवळणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसिलदार संजय वारकड, डॉ.आण्णासाहेब शिंदे हे उपस्थित होते. त्याचबरोबर शुभांगी केतन काजे , डॉ.नयना तायडे, अवचित वळवळे, केतन काजे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.