छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत, राज ठाकरे यांना ध्येयधोरण तरी आहे, तुमच्याकडे तेही नाही. राज ठाकरे काय पाकिस्तानामधून आलेत का? त्यांना अधिकार नाही का? तुमच्याकडे जर काही धोरण असतील तर सांगा मात्र ते तुमच्याकडे नाहीत. नुसते सकाळी सकाळी भू भू भुंकतो, मात्र हे एकदाच बोलतात पण लाखातला एक शब्द बोलतात, अशा भाषेत संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांचे समर्थन केले.
सुषमा अंधारेंबाबत चुकीचे बोललो नाही :ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल मी चुकीचे बोललो नाही. मात्र, त्या नेहमी विद्वान असल्यासारख्या बोलतात. हावभाव करतात, अभिनय करतात आणि टाळ्या मिळतात. मात्र, असे करताना त्यांना इतरांचा अवमान करण्याचा अधिकार कोणी दिला. शिवसेनेचा आणि तुमचा संबंध काय? तुम्ही आता आल्या आहात. मग आमच्या मानगुटीवर बसता कशाला, बसत असाल तर उद्धव ठाकरे यांच्या मानगुटावर बसा, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. सुषमा अंधारे यांनी कधी आमदारकी लढवली का? एकदाच लढवली होती तर त्यावेळेस 400 च्या जवळपास मते त्यांना मिळाली होती. परत त्या किती दिवस पक्षात राहतील याची शाश्वती त्यांना पक्षात घेणाऱ्यांनादेखील नाही. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही, असेदेखील शिरसाट यांनी सांगितले.