औरंगाबाद -भाजप नौटंकी करत असल्याचा आरोप शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. महानगर पालिकेत उपमहापौर पदांसोबत इतर पदांचा राजीनामा का दिला नाही, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला आहे.
पाणी योजनेच्या स्थगितीचा मुद्दा घेऊन भाजप नगरसेवक विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महानगर पालिकेत युती तोडल्याची घोषणा भाजपने केली. महानगर पालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची भाषा करणाऱ्या भाजपने इतर पदांचा राजीनामा का दिला नाही, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला.
पाणी योजनेच्या स्थगितीच्या मुद्यावरून भाजपने महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ घातला. पाणी योजना मंजूर होईपर्यंत विरोधी भूमिका घेऊ असे सांगत भाजप नगरसेवक विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना उपमहापौरपदाचाच का? महानगर पालिकेच्या स्थायी समिती पदासह इतर समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे आहे. त्या पदांचा का राजीनामा दिला नाही, असा प्रश्न आमदार दानवे यांनी उपस्थित केला.