औरंगाबाद- प्रत्येक शहरात मान्सूनपूर्व नाले सफाईचे काम करणे गरजेचे असते. मात्र पैठण नगर परिषदेने काही भागातील नालेसफाई केली नसून जे काम केले ते सुद्धा थातूरमातूर केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील शशीविहार,सराफनगर परिसरात पहिल्याच पावसाने पाणी साचल्याने हे पाणी काढण्यासाठी या प्रभागातील नगरसेवक प्रयत्नशील नसल्याचाही अरोप नागरिक करत आहेत.
पैठण नगरपरिषदेचे नालेसफाईचे पितळ उघडे नालेसफाईचा देखावा -
दरवर्षी पावसाळ्यात शहरातील सात मुख्य मोठ्या नाल्यांची सफाई होत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरते. शहरातील अनेक भागात नालेसफाई करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दोन दिवसापूर्वीच नगरपरिषदेने काही भागातील नालेसफाई करत असल्याचा देखावा केला. मात्र पहिल्याच पावसात नालेसफाईचे पितळ उघडे पडले. दरवर्षी पावसाळ्यामध्ये तसेच नेहमी सदर ड्रेनेज लाईन ब्लॉक होऊन ड्रेनेज मधील घाण पाणी रस्त्यावर साचते. तसेच वसाहती बाहेरील नाल्याचे घाण पाणी देखील नाथविहार, शशीविहार वसाहतीमध्ये शिरते. त्यामुळे सदर वसाहतीमधील मुलांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना जाण्या-येण्यासाठी घाण पाण्यातून जावे-यावे लागते.
आरोग्यासाठी धोकादायक -
रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे तेथे मच्छर, रोगराईचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भिती आहे. सध्या कोरोनाने थैमान घातलेले आहे. मात्र नगरपरिषद पैठण मार्फत वसाहतीमध्ये स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची दक्षता घेण्याचे प्रयत्न दिसून नाही.