औरंगाबाद - देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्व नेत्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा शब्द दिला आहे. तसा कोणी प्रयत्न केला तर आम्ही होऊ देणार नाही माझे मंत्रीपद गेले तरी चालेल मात्र आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
मराठवाडा ओबीसी कार्यकर्ता परिषदेत गोंधळ
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यात आरक्षणाबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. अशातच काही मराठा संघटनांनी आमचा समावेश ओबीसींमध्ये करा, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी नेत्यांकडूनही बैठका घेण्यात येत आहेत. त्यातच औरंगाबादमध्ये विजय वडेट्टीवार यांनी मेळावा घेतला केले. मात्र, या ओबीसी कार्यकर्ता मेळाव्यात गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या समोरच मंचावर हा गोंधळ झाला. बालाजी शिंदे यांनी भाषण करताना छगन भुजबळ यांनी पाप केले, असे वक्तव्य केल्याचा आरोप करत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावर गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगत सवरासावर केली.