महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सत्तार यांची शिवराळ भाषा, व्हिडिओ झाला व्हायरल

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गोतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. त्यानंतर मंत्री सत्तार यांची खालच्या भाषेत उपस्थितांना तंबी तसंच, गोंधळ घातलेल्या तरुणांवर लाठीचार्ज करण्याचेही दिले आदेश. पाहा नक्की काय आहे प्रकरण.

Minister Sattar
गौतमी पाटील कार्यक्रमात सत्तार

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 3:04 PM IST

Updated : Jan 4, 2024, 3:49 PM IST

गौतमी पाटील कार्यक्रमात सत्तार

छत्रपती संभाजीनगर : गौतमी पाटील आणि कार्यक्रमात होणारा गोंधळ हा नेहमीचाच झालाय. मात्र, काल बुधवारी झालेल्या कार्यक्रमात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवराळ भाषा वापरल्याने चांगलाच चर्चेत आलाय. कार्यक्रमावेळी काही तरुणांनी गोंधळ केला. त्यानंतर सत्तार यांनी हा गोंधळ आवरण्यासाठी पोलिसांना थेट जमावावर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. तसंच, गोंधळ घालणाऱ्या लोकांना अटक करून, मारहाण करा त्यांचा मी जामीनही होऊ देणार नाही असा सज्जड दमच दिला. राज्याचे मंत्री असताना अशा भाषेत बोलल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या माध्यमावर सत्तार यांचा हा व्हिडिओ टाकत खरपूस शब्दांत समाचार घेतलाय.

विजय वडेट्टीवार

धक्काबुक्की केल्याने चांगलाच गोंधळ : मंत्री अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस असल्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. तसंच, गौतमीचा कार्यक्रम असला की, गोंधळ हा ठरलेलाच असतो अशी परिस्थिती आहे. येथेही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याने काही लोकांनी धक्काबुक्की केल्याने चांगलाच गोंधळ झालेला पाहायला मिळाला. आयोजकांनी शांततेत कार्यक्रमाचा आनंद घेण्याचं आवाहन केलं. मात्र, लोकांचा गोंधळ सुरूच होता. त्यातच मंत्री अब्दुल सत्तार उठले आणि त्यांनी तेथील काही प्रेक्षकांना अर्वाच्च भाषेत चांगलंच सुनावलं. त्यामुळे आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.

पोलिसांनी केला लाठीचार्ज : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याने सत्तार चांगलेच भडकले. गोंधळ घालणाऱ्यांना कोणी पाठवले हे माहीत आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करून गोंधळ घालणाऱ्यांना जेल मधे टाका. तिथे देखील त्यांना चोपा, त्यांचा जामीन देखील होणार नाही, असं म्हणत उपस्थितांचे आई बाप देखील काढले. सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला. लोकप्रतिनिधी असून, अशा भाषेत बोलणे अपेक्षित नाही. मात्र, सत्तार यांनी याआधी देखील अशा भाषेत मतदारांना झापले होते. पुन्हा एकदा असं वक्तव्य केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर तोफ डागली आहे. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करत सत्तार यांच्यावर टीका केली आहे.

पोलिसांना आपल्या टोळीचे गुंड समजता का :विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक्स हॅन्डलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी राज्यातील महायुती सरकारला जाब विचारात हीच महायुतीची संस्कृती आणि भाषा का, असा प्रश्न विचारलाय. तसंच, मंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानत ते म्हणाले की, महायुती सरकारचा खरा चेहरा सत्तार यांनी जनतेसमोर आणलाय. मंत्री सत्तार एका कार्यक्रमात हाजारोंच्या गर्दीवर लाठी चार्ज करण्यासाठी पोलिसांना तोंडी आदेश देतात आणि फोडण्याची भाषा करतात याचा अर्थ पोलीस दलातील जवानांना महायुती सरकार मंत्री स्वतःचे गुंडे समजतात का? तसंच, सांस्कृतिक सामाजिक प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांच्या आई-वडिलांबाबत अश्लील शब्दाचा वापर केल्याने उपस्थित असलेल्या माय भगिनींना मान खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री असंही ते म्हणालेत.

मुख्यमंत्री शिंदेंपुढे आव्हान :महायुती सरकारमधील शिंदे गटाचे सर्वात जास्त वादग्रस्त वक्तव्याने प्रसिद्ध असलेले मंत्री अब्दुल सत्तार यांनी वाढदिवसानिमित्ताने ठेवलेल्या कार्यक्रमात लोकांबाबत वापरलेल्या असभ्य भाषेबाबत व्हिडिओ आपण पहिला आहे. कायमच अशा प्रकारचे वादग्रस्त विधान ते करत असतात. संजय शिरसाठ संजय गायकवाड आणि अब्दुल सत्तार हे कायमच वादग्रस्त विधान करत असतात. यांना सांभाळून घेण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावं लागतं. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसू शकतो. यामुळे अशा वाचाळवीरांना लोकशिक्षण किंवा प्रबोधन करण्याची गरज असल्याचं राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा :

प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य, तर आव्हाडांच्या घरापुढे आंदोलन

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांचे तिळमात्र विचार उरले नाहीत-रवी राणा

राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर कर'; शरद पवार यांची साई चरणी प्रार्थना

Last Updated : Jan 4, 2024, 3:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details