औरंगाबाद (सिल्लोड) - देशातील ग्रामपंचायती सक्षम झाल्या तर देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. ग्राम विकास हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंचायतराज दिनाच्या निमित्ताने दिल्ली येथील विज्ञान भवनात शनिवारी झालेल्या पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. या पुरस्कार सोहळ्याला राज्यातर्फे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार पुणे येथून ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. तसेच अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय पंचायतराज मंत्री नरेंद्र सिंग तोमर यावेळी उपस्थित होते.
पंचायतराज दिनाच्या निमित्ताने शनिवारी पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, नानाजी देशमुख ग्राम गौरव पुरस्कार, ग्रामपंचायत विकास अभियान, बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात राज्यातील एक जिल्हा परिषद दोन पंचायत समित्या आणि 17 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
स्वामित्व योजनेचे उद्घाटन
ग्रामीण भागातील एकात्मिक मालमत्ता निधी ग्राह्यता उपाय उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सरकारने स्वामित्व योजना सुरू केली. या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रासह सहा राज्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यातील 1 हजार ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मालमत्ता पत्रकाचे वाटप करण्यात आले .
ग्राम विकास महत्त्वाचा
सर्व पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे प्रथमतः अभिनंदन. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांच्या दूरदृष्टी विचाराने म्हणाले होते की खेड्याकडे चला. कारण देशाचा विकास करायचा असेल तर आगोदर खेड्याचा विकास झाला पाहिजे हा त्यांचा मूळ उद्देश होता. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला तर देश सशक्त होईल. अशा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.