औरंगाबाद - सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या भिंतीवरून उडी मारत एक मनोरुग्ण चक्क वाघाच्या पिंजऱ्याजवळ पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत उघडकीस आला. वाघ पिंजऱ्यात बंदिस्त असल्याने अनर्थ टळला असून उद्यान कर्मचाऱ्यांनी या मनोरुग्णाला पोलिसांच्या स्वाधीन केले.
पिसादेवी रोडवरील श्रीकृष्णनगर येथील हा मनोरुग्ण युवक असून रवींद्र ससाणे असे त्याचे नाव आहे. हा मनोरुग्ण रात्री उद्यानात शिरला होता. सकाळी सातपर्यंत तो वाघ फिरतो, त्या जागेवर होता. रात्री वाघ पिंजऱ्यात बंदिस्त असल्याने अनर्थ टळला असला तरी उद्यान सुरक्षा कुचकामी असल्याचे समोर आले आहे.
मराठवाड्यातील एकमेव असलेल्या औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात मनुष्य आणि प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्यानाच्या मागील बाजूस भिंत मजबूत नसल्याचे समोर आलं आहे. मागील बाजूच्या भिंतीवरून रात्री रवींद्र ससाणे नावाचा मनोरुग्ण घुसला. त्याने भिंतीवरून उडी मारल्यावर तो ज्या ठिकाणी दिवसाच्या सुमारास वाघ मुक्त संचार करतो, अशा ठिकाणी पडला. मात्र, रात्री वाघ पिंजऱ्यात बंदिस्त असल्याने रवींद्र सुरक्षित राहिला. सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उद्यान कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने वरिष्ठांना आणि क्रांतिचौक पोलिसांना याबाबत माहिती दिली.
औरंगाबादला वाघाच्या पिंजऱ्यात झोपला तरुण, थोडक्यात वाचला जीव
सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या भिंतीवरून उडी मारत एक मनोरुग्ण चक्क वाघाच्या पिंजऱ्याजवळ पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत उघडकीस आला. पिसादेवी रोडवरील श्रीकृष्णनगर येथील हा मनोरुग्ण युवक असून रवींद्र ससाणे असे त्याचे नाव आहे. रात्री वाघ पिंजऱ्यात बंदिस्त असल्याने अनर्थ टळला. मात्र, या प्रकारानंतर उद्यान सुरक्षा कुचकामी असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी तातडीने उद्यानाकडे धाव घेत मनोरुग्ण युवकाला ताब्यात घेतले. या युवकाकडे वडिलांचा मोबाईल क्रमांक असल्याने त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क करणे सोपे झाले. रवींद्र मनोरुग्ण असल्याने त्याला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. लॉकडाऊन असताना आपल्या घरापासून हा मनोरुग्ण सात ते आठ किलोमीटर गेला कसा? युवक उद्यानाच्या भिंतीवर चढत असताना कोणाचे लक्ष कसे गेले नाही? उद्यानात वाघाच्या पिंजऱ्याच्या परिसरात शिरल्यावर उद्यानातील सुरक्षा रक्षकांचे रात्रभर लक्ष कसे गेले नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर तरी आता उद्यान प्रशासन जागे होईल का, हा खरा प्रश्न आहे.