औरंगाबाद- वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाची सोमवारी पुण्यात बैठक घेण्यात आली. ही बैठक वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी झाली. बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. मात्र, बैठकीत जागा वाटपाचा कोणत्याही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एमआयएम पक्षाला किती जागा हव्या आहेत आणि त्या कोणकोणत्या यावर आज पुण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएम पक्षाची एक बैठक घेण्यात आली. मागील विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने ज्या जागा लढविल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झाला नाही. तब्बल तीन तास ही बैठक एका बंद खोलीत झाली. वंचित आघाडी कडून स्वतः प्रकाश आंबेडकर तर एमआयएम पक्षातर्फे असदुद्दीन ओवेसी उपस्थित होते.
एमआयएमकडून औरंगाबादच्या तीनही मतदारसंघांवर दावा
एमआयएमकडून इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या तीनही मतदारसंघांवर दावा केला आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी सर्वच जागांवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. लवकरच जागांची घोषणा करण्याची चर्चा होती. त्यामुळे खा. ओवेसी यांनी बंद लिफाफ्यात एक पत्र पाठविले होते. यानंतर पुण्यात दोन्ही पक्षांमध्ये विधान सभेच्या २८८ जागांवर चर्चा झाली. गेल्या विधानसभेत एमआयएमने ज्या जागा लढविल्या होत्या, त्या जागा कायम राहतील. या शिवाय आणखी काही महत्त्वपूर्ण मुस्लिमबहुल मतदारसंघांवर एमआयएमने दावा केला आहे.
याशिवाय अकोला विधानसभा मतदारसंघ एमआयएमला हवा आहे, अशी माहिती आहे. एमआयएमने आधी 100, नंतर 76 जागांची मागणी केली. त्यानंतर जागा वाटपात असून बसणार नाही मात्र सन्मान व्हावा, अशी इच्छा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली होती.