औरंगाबाद - शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यात औरंगाबादेत गुप्त बैठक झाली. या बैठकीत जालना लोकसभा लढवण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत असल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. जालना मतदार संघातील घडामोडींवर राज्याचे लक्ष लागले असून त्यात खोतकर आणि सत्तार यांच्या बैठकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
औरंगाबादच्या सातारा परिसरातील एका बिल्डरच्या घरी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यात गुप्त बैठक पार पडली. अर्धातास चाललेल्या या बैठकीत जालना लोकसभा निवडणूक लढवण्यावर चर्चा झाल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. अर्जुन खोतकर जालना लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे त्यांनी याआधीच जाहीर केले होते.
या निवडणुकीत युती होणार नाही, अशी घोषणा सेनेने केल्याने गेल्या दोन वर्षात अर्जुन खोतकर यांनी लोकसभा लढवण्याची तयारी केली होती. मात्र, सेना भाजपच्या नेत्यांनी अचानक युतीची घोषणा केल्याने अर्जुन खोतकर पक्षाच्या निर्णयावर खूश नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच खोतकर लोकसभा लढवण्यासाठी काँग्रेस प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
गुरुवारी दुपारी औरंगाबादच्या सातारा परिसरात अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांची गुप्तबैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत जालना लोकसभा निवडणूक लढवण्यावरुन चर्चा झाल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली असून दोन दिवसात खोतकर आपला निर्णय जाहीर करतील असेदेखील अब्दुल सत्तार यांनी दिली.