औरंगाबाद- कन्नड तालुक्यातील पिशोर भिलदरी येथील एका शेतातून पोलिसांनी ६६ किलो गांजा जप्त केला आहे. या गांज्याची किंमत १ लाख ९६ हजार ८३० रुपये एवढी आहे. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अधिक माहिती अशी की, भिलदरी जाहगीर गावातील रामकिसन साडुदास वैष्णव (बैरागी) याने शेतातील अद्रक व मक्याचा पिकांमध्ये गांजाची झाडे लावली असल्याची गुप्त बातमी पोलीस उपअधीक्षक जगदीश सातव यांना मिळाली होती. त्याआधारावर पोलीस उपअधीक्षक सातव हे पोलीस नाईक केसरसिंग राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल राहुल लहाने, महेश जाधव यांनी पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी घेऊन रामकिसन वैष्णव यांचा शेतात गेले. शेतात पोलिसांना अद्रक व मक्याबरोबर हिरवीगार जीवंत गांजाची झाडे दिसली. पोलीस पथकानी ती झाडे मुळासोबत उपटली. पोलिसांनी एकूण १७ गांजाची झाडे व तोडून ठेवलेली गांजाची झाडे असा एकूण १ लाख ९६ हजार ८३० रुपयांचा माल जप्त केला आहे.