छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Marathwada Water Issue:यंदा मराठवाड्यावर भीषण पाणीटंचाईचं संकट गोंगवत आहे. जायकवाडी धरणात क्षमतेच्या अर्धच पाणी शिल्लक असल्यानं शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे समन्यायी पाणी वाटपाच्या नियमानुसार नगर, नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडा अशी मागणी गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आली; मात्र पाणी सोडता येणार नाही अशी भूमिका घेत नगर आणि नाशिकच्या राजकीय नेत्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तर दुसरीकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 30 ऑक्टोबरला पाणी सोडण्याचे निर्देश दिले. तरीदेखील अद्याप नगर आणि नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यात आलं नाही. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येत आकाशवाणी जवळ गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलनात आमदार राजेश टोपे, आमदार संजय शिरसाट, आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार अर्जुन खोतकर, कल्याण काळे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला.
वेळेवर पाणी न सोडल्यास होणार नुकसान:पर्जन्यमान कमी झाल्यास धरणांमध्ये पाण्याचा साठा पाहून पाणी सोडण्याचा नियम आहे. असं असलं तरी मराठवाड्यात दुष्काळ पडल्यावर भांडण्याची वेळ नेते आणि नागरिकांवर येते. यंदा साडेआठ टी.एम.सी पाणी नगर आणि नाशिकच्या धरणांमधून सोडण्याचे निर्देश आहेत. मात्र, अद्याप पाणी सोडण्यात आलेलं नाही. आता जर पाणी सोडलं तर अवघ साडेपाच टीएमसी पाणी जायकवाड धरणात दाखल होईल. उर्वरित तीन टी.एम.सी पाणी नदीपात्रात मुरणार आहे. जसजसा वेळ जाईल तसं पाण्याचं नुकसान अधिक होणार आहे. त्यामुळे लवकर पाणी सोडा, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी केली.