महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठवाडा मुक्तिसंग्राम : मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी लढावा लागला वेगळा लढा - मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी त्यावेळी हैद्राबाद संस्थानासह उत्तरेतील काश्मीर आणि जुनागढ संस्थानांनी मात्र भारतात समाविष्ठ होण्यास नकार दिला होता. त्यामुळे हैदराबादच्या निजामाच्या संस्थांना विरोधात वेगळा लढा उभारावा लागला. वाचा सविस्त काय घडलं होतं..

मराठवाडा मुक्तिसंग्राम
मराठवाडा मुक्तिसंग्राम

By

Published : Sep 17, 2020, 5:20 AM IST

Updated : Sep 17, 2020, 5:45 AM IST

औरंगाबाद- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाडा, हैदराबादला एक वर्षाने स्वातंत्र्य मिळाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सोळा जिल्ह्यांसाठी वेगळा लढा उभारावा लागला. या लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपला मोलाचा वाटा उचलला.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी त्यावेळी हैद्राबाद संस्थानासह उत्तरेतील काश्मीर आणि जुनागढ संस्थानांनी मात्र भारतात समाविष्ठ होण्यास नकार दिला होता. त्यामुळे हैदराबादच्या निजामाच्या संस्थांना विरोधात वेगळा लढा उभारावा लागला. गोविंदभाई श्रॉफ, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या असंख्य स्वातंत्र सैनिकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापेक्षा तेरा महिन्यांचा अधिकचा लढा मराठवाडा आणि हैद्राबादच्या मुक्तीसाठी लढला आणि अखेर 17 सप्टेंबर 1948 ला हैद्राबाद संस्थान भारतात विलीन होत महाराष्ट्रात विनाअट समाविष्ट झाले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन विशेष

हैदराबाद आणि मराठवाड्यातील पाच जिल्हे हैदराबाद संस्थानात येत होते. हैदराबाद हे दक्षिणेतील मोठे संस्थान निजामशाहीच्या अंमलाखाली असलेल्या संस्थानात होते. त्यावेळी सातवा निजाम मीर उस्मान अली खान बहादूर निजामदौलाह होता. त्याने भारत स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थान भारतात समाविष्ट करायला नकार दिला. त्यावेळी हैदराबाद संस्थानामध्ये सोळा जिल्हे येत होते. त्यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद यासह तेलंगणाचे आठ जिल्हे आणि कर्नाटकातील तीन जिल्ह्यांचा समावेश होता. निजाम त्यावेळेस संस्थान स्वतंत्र देश व्हावा किंवा हैदराबाद संस्थानचा समावेश पाकिस्तानमध्ये व्हावा, अशी त्याची इच्छा होती आणि त्यामुळेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक वेगळा लढा मराठवाडा मुक्तीसाठी करावा लागला. याला मराठवाडा मुक्तिसंग्राम किंवा हैदराबाद मुक्तिसंग्राम असे म्हटले जाते.

हेही वाचा -ईटीव्ही विशेष रिपोर्ट: पाटनूरचे जंगल मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार..

हैदराबाद मुक्तिसंग्राम हा संपूर्ण संस्थानात लढला गेला असला, तरी मराठवाडा प्रदेश या स्वातंत्र्य लढ्यात अग्रणी राहिला. या प्रदेशातील जिल्हे आणि प्रत्यक्ष हैदराबाद येथील मराठवाड्याची नाळ जुळलेला वर्ग या लढ्यामध्ये सक्रिय झाला. या लढ्यात जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन हा लढा उभारला गेला होता. त्यावेळी देशाचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी सैन्य कारवाईचा निर्णय घेतला होता. निजाम भारतात समाविष्ट व्हायला तयार होत नसल्याने जानेवारी 1948 मध्ये सैनिकी कारवाई करण्याचा विचार करण्यात आला. त्यासाठी पुणे येथील सैन्य दलाच्या प्रमुख कार्यालयाला संपर्क देखील करण्यात आला होता. सैन्याची जमवाजमव आणि इतर तयारी करताना तीन चार महिन्यांचा अवधी लोटला गेला. अखेर सप्टेंबर महिन्यात भारतीय सैन्याने निजाम राजवटीवर हल्ला केला. 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या काळात ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर निजामाने आपले संस्थान खालसा केले. असा हा मोठा लढा हैदराबाद मुक्तीसाठी करण्यात आला. मराठवाडा स्वतंत्र होऊन 72 वर्षांचा काळ लोटला. या काळात मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा वगळता इतर जिल्हे त्यामानाने मागास राहिल्याचे दिसून आले. मात्र, विकास होण्यासाठी मराठवाडा महाष्ट्रापासून वेगळा करा, अशी मागणी कधीही करण्यात आली नाही. महाराष्ट्रात राहून विकास करण्यासाठी आग्रही राहिलेला हा भाग आहे, असे मत राजकीय अभ्यासक आणि जेष्ठ पत्रकार संजय वरकड यांनी व्यक्त केले.

व्यवसाय, उद्योग, रोजगार या सर्वच बाबतीत काही जिल्हे विकास करू शकले नाहीत. तसे पाहिले तर मराठवाड्यातून आत्तापर्यंत तीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सत्तेत सहभागी होते. केंद्राची अनेक मंत्रीपदे मराठवाड्याच्या वाट्याला आली. मात्र, मराठवाड्यासाठी राजकीय दबाव निर्माण करण्यात राजकीय मंडळी अपयशी ठरले. त्यामुळे इतर भागाच्या तुलनेत मराठवाड्यात विकास खूप कमी झाला. त्यामध्ये सिंचनाचे अनेक प्रकल्प अपूर्ण राहिले. ते अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे मराठवाड्याच्या सिंचनाचा प्रश्न हा आजही कायम आहे या भागाचा विकास करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असती तर निश्चित हा भाग ही राज्यातील इतर भागांसारखाच प्रगत राहिला असता असे मत अभ्यासक सारंग टाकळकर यांनी व्यक्त केले.

मराठवाड्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान...

मराठवाडा स्वतंत्र झाला तरी शिक्षणाच्या बाबतीत हा विभाग मागास होता. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जावे लागायचे. हे खर्चिक शिक्षक घेणे मराठवाड्यासारख्या मागास भागातील गरीब विद्यार्थ्यांना शक्य नव्हते. त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आणि नंतर विद्यापीठाच्या स्थापनेचा पाया रोवला. मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि मराठवाड्यातील गोर-गरीब मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली गेली. आज मराठवाड्यात उच्च शिक्षण घेणे शक्य झाले ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच..

Last Updated : Sep 17, 2020, 5:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details