औरंगाबाद -मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया एक डिसेंबरला पार पडणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच होणारी ही निवडणूक रंगतदार होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवार प्रचारात आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष मतदान करवून घेण्यासाठी उमेदवारांना प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्यात एकूण पाच ठिकाणी शिक्षक आणि पदविधर मतदार संघासाठी आज (मंगळवार ) मतदान होत आहे.
दोन्ही उमेदवार याबाबत आपली प्रतिक्रिया देताना. मराठवाडा पदवीधर मतदार संघात एकूण 3,74,045 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ज्यामध्ये औरंगाबाद - 1,06,500, जालना - 27,990, परभणी - 32,735, हिंगोली - 16,774, नांदेड - 49,365, लातूर - 41,249, उस्मानाबाद - 33,636, बीड - 63,436 मतदार मतदान करणार आहेत. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये 813 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
मतदारांमध्ये महिलांची संख्या खूप कमी -
पदवीधर मतदार संघात होणारी निवडणूक शिक्षित वर्गाची महत्त्वाची निवडणूक मानली जाते. मराठवाड्यात एकूण मतदार 3,74,045 इतकी असून यात महिला मतदारांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पुरुष मतदार 2 लाख 86 हजार 543 इतकी असून महिला मतदार अवघ्या 86 हजार 937 इतकीच आहे. त्यामुळे मतदार नोंदणी प्रक्रियेत महिला मतदारांची नोंदणी अत्यल्प झाली की पदवीधर महिलांची संख्या कमी आहे याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -'भाजप कोणत्याही मुस्लीम व्यक्तीला तिकीट देणार नाही'; भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
अशी असेल निवडणुकीतील रंगत -
गेल्या बारा वर्षांपासून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण दोन वेळा या मराठवाडा पदवीधर मतदार संघात निवडणून आले. तसा भाजपचा पारंपरिक मतदार संघ मनाला जातो. मात्र, 2008 मध्ये राष्ट्रवादीने हा मतदार संघ भाजपकडून ओढून घेतला. यावेळी पुन्हा विजय मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार यांनी पदवीधरांचे प्रश्न सोडवले नाहीत, फक्त ठेकेदारी केल्याचा आरोप भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी केला. त्यामुळे आरोप प्रत्यारोपानंतर नेमके कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.