औरंगाबाद - मराठा आरक्षण याचिका सुनावणी लांबल्याने राज्यात पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडली आहे. संतप्त झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध केला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर आज पैठण महामार्गावर सरकार विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली. रस्त्याच्या मधोमध टायर जाळून मराठा आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. न्यायालयात योग्य बाजू न मांडणाऱ्या अशोक चव्हाण यांनी तातडीने उपसमिती वरून हकालपट्टी करा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
..अन्यथा पुन्हा आंदोलनाला सुरुवात
सर्वोच्च न्यायालयात याचिका असताना सरकारी वकील गैरहजर राहिले. सरकारला मराठा आरक्षण याचिका महत्त्वाची वाटत नाही का? असा संतप्त प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. आजच्या सुनावणीत स्थगिती उठली नाही तर आंदोलनाला सुरुवात होईल असा इशारा शनिवारी झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत देण्यात आला होता.