छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पोखरी शिवारात शुभम अशोक गाडेकर या २३ वर्षीय युवकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सकाळी त्याच्या काकाच्या शेतातील आलं विक्री करण्यासाठी तो बाहेर पडला होता. मात्र, घरी परतताना मोकळ्या जागेवर गाडी उभी करून त्यानं आत्महत्या केली. शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याला हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. त्या शेतकऱ्यानं तत्काळ पोलीस पाटलांना याबाबत माहिती दिली. त्यामुळं मराठा समाज बांधव आक्रमक झाले असून त्यांनी मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तर स्थानिक पातळीवर आंदोलन सुरू असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविचछेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र शासनाची मदत मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय सकल मराठा समाजानं घेतलाय.
आंदोलनात होता सक्रिय सहभाग :शुभम गाडेकर महानगर पालिकेच्या पोकलेनवर कंत्राटी चालक म्हणून काम करत होता. घरी वडील मजुरी करून कुटुंब चालवतात. परिस्थिती बेताची असल्यानं बारावी नंतर शुभम शिक्षण सोडून वडिलांना कामात मदत करत होता. मोठा भाऊ देखील पोकलेन चालवण्याचं काम करतो. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असायचा. तो आंदोलनात कायम सहभागी होत असे. मनोज जरांगे यांच्या सभेला जाण्यासाठी त्यानं मित्रांकडून पैसे घेतले होते. आज देखील सकाळी सावंगी येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी जाणार होता. त्यासाठी झेंडा घेण्यासाठी भावाकडून पैसे घेतले होते. मात्र सकाळी अचानक त्यानं रस्त्यातच आत्महत्या केली. त्यामुळं कुटुंबावर शोककळा पसरलीय.
मराठा समाज आक्रमक :घटना कळताच पंचक्रोशीतील मराठा समाज बांधवांनी घटनास्थळी धाव घेतली. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची ग्रामस्थांनी भूमिका घेतली. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. प्रशासनानं कुटुंबीयांना मदत, एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन दिल्यावर मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. मात्र सरकारतर्फे मदत मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली.