छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil : माझी प्रकृती चांगली असून मी ठणठणीत आहे. काळजी करु नका. डॉक्टरांनी मला ठणठणीत बरं केल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. माध्यमांशी बोलताना त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. मराठा समाजावर आतापर्यंत खूप अन्याय झालाय. परंतु, आता चांगले दिवस आलेत. आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ येतोय. तसंच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपलं आंदोलन सुरू राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय.
पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार : मनोज जरांगे पाटील यांनी आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं सांगितले. दौरा कधीपासून सुरू होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. जरांगे पाटील म्हणाले, या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागांत आपण जाणार आहोत. मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रत्येक गावात 1 डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही : आपलं आंदोलन शांततेचं आणि लोकशाही मार्गाचं आहे. उद्रेक होईल, असं काही करू नका. अस आवाहनही जरांगे पांटलांनी केलंय. आता कोणीही आत्महत्या करू नका. 24 डिसेंबरपर्यंत आपणास खांद्याला खांदा लावून लढायचं आहे. न्यायाचा दिवस जवळ आलाय. न्याय मिळवण्यासाठी सातत्य ठेवावं लागणार असल्याचं जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलं. आतापर्यंत आमच्यावर खूप अन्याय झालाय. हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालेलं नाही. आम्हाला शेती पाहून मुलांसाठी काम करायचं आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा मनोज जरांगे पाटील यांनी पुनरुच्चार केला.
- गुरुवारी उपोषण घेतलं मागं :मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर गुरुवारी उपोषण मागं घेतलं. सरकारचं एक शिष्टमंडळ गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवली इथं गेलं होतं. यावेळी उपोषण मागं घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मराठा आरक्षणाच्या टाईम बाँडबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.
हेही वाचा :
- Maratha Reservation : कुणबी समितीबाबत राज्य सरकारनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय, मनोज जरांगे पाटील यांनी केली होती मागणी
- All Religions March In Shirdi : जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ शिर्डीत सर्वधर्मीयांचा मोर्चा
- Maratha Reservation : सामाजिक मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण नाही