छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मनोज पाटील यांनी आंदोलन सुरू केलंय. ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केलीय. त्यावेळी मराठवाडा विभागात कुणबी समाज आहे, त्याला आरक्षण मिळू शकतं अशी मागणी होतेयं. त्यामुळे आता या विभागात कुणबी असणाऱ्या नोंदी तपासण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आलेत. हे काम जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांना सोपवण्यात आलंय. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात या सर्व नोंदणीच्या प्रती जिल्हा परिषदकडं देण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्यानुसार जवळपास एक लाख मुख्याध्यापक कामाला लागले आहेत, अशी माहिती माध्यमिक प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आणि मुख्याध्यापक राजेश हिवाळे यांनी दिलीय. (Kunbi documents in Marathwada)
शिक्षण यंत्रणा कामाला : मराठवाड्यातील मराठा समाजाची कुणबी नोंद कुठं-कुठं आणि किती प्रमाणात आहे? याचा तपशील तत्काळ सादर करण्यात यावा, असा आदेश मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात धडकताच गावागावातील शिक्षण यंत्रणा कामाला लागलीय. त्यांच्या शाळेतील निर्गम उतारावर आणि शाळेच्या दाखल्यावर 'कुणबी' नोंद असणारे दाखले हुडकून काढत ती माहिती तत्काळ गुगल लिंकवर भरून शासनाला पाठवण्यास सुरुवात केलीय. पहिल्या दिवशी मिळालेल्या माहितीनुसार 14,00,000 (चौदा लाख) विद्यार्थ्यांपैकी अंदाजे 38000 (आडतीस हजार) कुणबी असल्याचं समोर आलंय. शासनानं मागवलेली माहिती ही थातूर-मातुर स्वरूपाची किंवा काम कुचराईपणामुळं 'निरंक' गेली. ही बाब पुढे चालून मराठवाड्यातील मराठा समाजाची कुणबी असणारी नोंद या विषयावर न्यायालयात टिकवण्यासाठी जिकरीची राहू शकते, त्यामुळं मेहनत घेऊन लक्षपूर्वक डोळ्यात तेल घालून काम करत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आणि मुख्याध्यापक राजेश हिवाळे यांनी दिलीय.