छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : कुणबी नोंदी शोधण्यासाठी महसूल विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर महसूल विभाग किंवा जिल्हा परिषद या विभागाकडून हे काम वेगानं पूर्ण करण्याचा निर्धार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय. तर रोहित पवार यांच्या कारखान्यावर कारवाई सुरु आहे, त्याबाबत आरोप केले जात आहेत. मात्र तपास यंत्रणा तपास करत आहेत. जर काही अडचण नसेल, तर घाबरण्यासारखं कारण नाही, असंही विखे पाटील यांनी सांगितलंय.
आरक्षण बाबत तातडीनं यंत्रणा काम करेल : मराठा आरक्षण बाबत सरकार लवकरच आपलं काम पूर्ण करेल. एका आठवड्यात समितीनं आपला अहवाल देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. काही प्रमाणात आरक्षणाबाबत काही आरोप झालेले आहेत. त्यांचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तातडीनं दाखले उपलब्ध करुन देण्याचं धोरण शासनानं अवलंबलेलं आहे. नोंदी शोधताना मोडी लिपी वाचणारे लोक जिथं आहेत, त्यांची मदत घेण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. तर जीर्ण झालेल्या नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना हाय स्पीड स्कॅनर लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, सॉफ्टवेअरला त्याचा फायदा होईल, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय.