छत्रपती संभाजीनगर Maratha Protest : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणदरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या प्रकरणानं आता चांगलाच पेट घेतलाय. आज यावरून औरंगाबाद जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या आवाहनाला उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळपासूनच जिल्ह्यातील बाजारपेठा ठप्प झाल्याचं चित्र होतं. यावेळी शहरातील क्रांती चौक भागात शिवसेनेच्या ठाकरे गटानं जोरदार निदर्शन करत, टरबूज फोडून आंदोलन केलं. मराठा क्रांती मोर्चानही यावेळी निदर्शनं करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली.
युवकानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला : यावेळी क्रांती चौक भागात शांततेत आंदोलन सुरू असताना एका युवकानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान मुकुंदवाडी येथील युवक कृष्णा भादवे हा स्वतःला पेटवून घेण्याच्या तयारीत होता. मात्र युवासेनेचे पदाधिकारी हनुमंत शिंदे पाटील, योगेश ओळेकर पाटील यांनी वेळीच खबरदारी घेत त्याला रोखलं. त्यांनी त्याच्या खिशातील ज्वलनशील साहित्य काढून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. यामुळे पुढील अनर्थ टळला. या युवकाला क्रांती चौक पोलीस ठाण्यात नेण्यात आलंय.
हेही वाचा :Sanjay Raut : मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करता येत नाही का? संजय राऊतांचा सरकारला सवाल
औरंगाबाद जिल्हा बंदचं आवाहन : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आज (४ सप्टेंबर) मराठा संघटनांनी औरंगाबाद जिल्हा बंदचं आवाहन केलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून शिवसेनेच्या ठाकरे गटानं क्रांती चौकात जोरदार निदर्शनं करत सरकारचा निषेध केला. आंदोलकांनी टरबूज हातात घेऊन फोडले आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 'सरकार कुठेतरी मुद्दाम राजकारण करत वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे', असा आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केला.
जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त : जिल्हा बंदची हाक दिल्यानंतर सकाळी दहा वाजल्यापासून मराठा क्रांती मोर्चाचे युवक रस्त्यावर उतरले. त्यांनी शहरातील विविध भागात जाऊन बंदचं आवाहन केलं. त्यामुळे शहरात काही काळ तणावपूर्ण शांतता होती. सध्या जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी रस्ता बंद करून आंदोलन करणाऱ्या युवकांना अडवलं. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस यंत्रणेनं योग्य ती खबरदारी घेतली असून, आमच्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, असं आंदोलन करणाऱ्या युवकांनी म्हटलंय.
हेही वाचा :Raj Thackeray Met Maratha Protestors : सरकारला तुमची फक्त मतं पाहिजेत; मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी राज ठाकरे जालन्यात