कन्नड - (औरंगाबाद) - कन्नड़ तालुक्यातील सिरजगाव, गोकुळ नगर, रेल तांडा, रेल या परिसरातील रस्त्यावरुन मुरुम व मातीची अवैधपणे ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याची दखल घेत ही अवजड वाहतूक थांबण्याची मागणी मराठा मावळा संघटनेने केली आहे. मागणीचा विचार न झाल्यास हवा छोडो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत लाडे यांनी निवेदनाद्वारे दिला
तालुक्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच शिवुर ते अजिंठा राज्य महामार्गचे चौपदरीकरण रुंदीकरणाचे काम दिलीप बिल्डकॉन व कल्याण टोल कंपनी कडून सुरू आहे. सदर रोडच्या कामाकरिता शिरजगाव, रेल तांडा, रेल, गोकुळ नगर या परिसरातुन मुरुम, माती, दगड, खडी, ची हायवा ट्रक द्वारे क्षमते पेक्षा ओव्हरलोड वाहतूक सुरू आसल्याने या भागातील जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.
तसेच रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच वाहन निरीक्षक विभागाच्या नियमानुसार वाहन क्षमते एवढीच वाहतूक करावी,अन्यथा या अवजड वाहनांची सोडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.