औरंगाबाद -राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्या दरम्यान जयंत पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून चालु अर्थ संकल्पामध्ये मराठा समाजासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करण्याच्या मागणीसाठी जयंत पाटील यांच्या सभेत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्यावतीने जाब विचारण्यात आला. महाआघाडी सरकारने यानंतर जर मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर, येणाऱ्या काळात राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. मराठा समाजाला गृहित धरुन यापुढे कोणालाही राजकारण करु देणार नसल्याचेही मराठा क्रांतीमोर्चाच्या कार्यकर्ते म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ नाही घातला तर ते मला भेटायला आले होते, असे जयंत पाटील म्हणाले. आमची मराठा समाजाच्या आंदोलकांसोबत चर्चा सुरु असून लवकरच त्यावर तोडगा निघेल, असे पाटील म्हणाले.